इकोफ्रेंडली लाईफस्टाईलसाठी समजून-उमजून पर्यायांची निवड.

छोट्या छोट्या गोष्टींतून सवयी बदलणे !

Social Lab
6 min readMay 3, 2021

सर्वांना वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा!

वाढत्या नैसर्गिक साधन संपत्तीचा होणारा र्‍हास, प्रदूषण, हवामानातील होणारा बदल (क्लायमेट चेंज) आणि जैविक विविधतेची होणारी हानी टाळण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. याच आधारावरवसुंधरा दिन हा पर्यावरण रक्षणाला पाठिंबा दर्शवणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे. हा दिवस दरवर्षी 22 एप्रिलला जगभरात मिरवणुका काढून, परिषदा, स्पर्धा आयोजित करून साजरा केला जातो. पण यावर्षी चित्र वेगळं आहे. कोरोना पँडेमिकने सगळ्या जगाला आपल्या पकडीत जखडलं आहे. म्हणूनच आपल्या ग्रहाची ही हक्काची सुट्टी जगभर व्हर्चुअल पद्धतीने साजरी केली जातेय. पेशंट्सच्या वाढत्या संख्येमुळे सरकारने लोकांना सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) पाळण्याचे आणि घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी निभावताना, निसर्गाची काळजी घेणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या व आपल्या पुढच्या पिढीला निरोगी, दीर्घ व आनंददायी आयुष्य लाभण्यासाठी पर्यावरण संवर्धन मूलभूत आहे. त्यामुळेच इको फ्रेंडली लाइफस्टाइल द्वारे आपण पर्यावरण संवर्धनामध्ये हातभार लावायला पाहिजे.

यासाठी आपण आपल्या सध्याच्या सवयी तपासून वसुंधरेसाठी अधिक चांगल्या अशा सवयी जोपासू शकतो. ते साध्य करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणजे समजून उमजून पर्यायांची निवड करणे. जर तुम्ही इकोफ्रेंडली जीवनपद्धती कशी सुरू करावी या गोंधळात असाल आणि नेमकी कुठून सुरुवात करावी हे कळत नसेल तर ही तुमच्यासाठी योग्य जागा आहे. आमचा ब्लॉग तुम्हाला रोजच्या जगण्यातल्या काही अशा बदलांची ओळख करून देईल जे तुम्हाला तुमचं कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी तर मदत करतीलच, शिवाय तुम्हाला एक जागरूक नागरिक बनवतील.

इथे जे बदल म्हंटलं आहे, ते अंमलात आणायला सोपे आहेत आणि दीर्घकाळात आपल्या पैशांचीही बचत करणारे आहेत. काही गोष्टी हळूहळू बदलता येतील. शाश्वत गोष्टी आणण्यासाठी आत्ता आहेत त्या सवयी,गोष्टी तडकाफडकी टाकून देण्याची नक्कीच आवश्यकता नाही. इकोफ्रेंडली पर्याय निवडणे महत्त्वाचे आहेच, पण त्याबद्दल जागरूक आणि इच्छुक असणे अधिक महत्त्वाचे आहे. ऊर्जा, पाणी , ग्रॉसरी आणि इतर गोष्टींचा प्रभावशाली वापर; कचऱ्याचा पुनर्वापर व योग्य विल्हेवाट; आणि नैसर्गिक पदार्थांचा प्रयोग हे इको फ्रेंडली लाइफस्टाइल चे आधारस्तंभ आहेत.

Photo by Amy Shamblen on Unsplash

१. आपलं स्वैपाकघर अधिक ‘हिरवं’ करणे :

खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगपासून ते स्वयंपाकघरातल्या साबण, क्लिनिंग लिक्विड्सपर्यंत अनेक गोष्टी ह्या बऱ्याचश्या घरांतल्या कचऱ्याचा मुख्य स्रोत आहेत. आपण जुन्या पद्धतींच्या जागी नव्या शाश्वत पद्धती सहज आणू शकतो. सुरुवात करायची तर कंपोस्ट खतापासून करता येईल. वाया जाणारं अन्न फेकून देण्यापेक्षा त्याचं कंपोस्ट करून झाडांना नैसर्गिक खत म्हणून देता येईल. कंपोस्टिंगबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आमचा होम कंपोस्टिंगचा ब्लॉग पहा. वाणसामान, भाजीपाला आणण्यासाठी कापडी पिशव्या वापरा आणि डाळ, तेल इत्यादी आणण्यासाठी घरातला डबा/बरणी नेता येईल असं एखादं दुकान शोधा. या व्यतिरिक्त सिंगल यूज प्लास्टिक ऐवजी धातू, काच किंवा तांब्याच्या वस्तू वापरा. पेपर टॉवेल्स आणि टिश्यूची उचलबांगडी करून त्याऐवजी पारंपरिक किचन कपडा/नॅपकिन वापरा.

शक्यतो मळखाऊ रंगाचे डिश टॉवेल्स वापरा. त्यावरचे डाग लगेच उठून दिसत नाहीत त्यामुळे थोडा अधिक काळ आपण ते वापरू शकतो. ही भांडी साफ करण्यासाठी इकोफ्रेंडली स्क्रब वापरा जे लाकूड, बांबू, नारळाची शेंडी किंवा केसर यापासून बनलेले असेल. खाद्यपदार्थ साठवताना स्टीलचे डबे, काचेच्या बरण्या वापराव्या. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीजमधल्या डब्यांवर ‘हे आधी खाणे’ अशा पट्ट्या चिकटवून ठेवा. तांदूळ,भाज्या धुण्यासाठी भरपूर पाणी वापरले जाते. हे पाणी वाया न जाऊ देता झाडांना घालण्यासाठी वापरा. या पाण्यात भरपूर पोषकतत्त्वे असतात.

Photo by Luisa Brimble on Unsplash

२. आपले बाथरूम इकोफ्रेंडली करण्यासाठी सोपे बदल :

कोणत्यातरी ‘एन्ड-ऑफ-सीझन’ सेलमुळे अर्ध्या किंमतीत मिळतायत म्हणून घाईगडबड करून घेतलेल्या वस्तू आणि इतर डिस्पोझेबल वस्तूंनी आपले बाथरूम भरलेले असते. यातले कुठलेही प्रॉडक्ट बदलण्यापूर्वी, तुमचे पर्सनल केअर प्रॉडक्ट्स तपासून पहा. त्यापैकी खरोखर गरज असलेल्या प्रॉडक्ट्सची वेगळी यादी करून मग तेवढ्याच प्रॉडक्ट्सऐवजी पर्यावरणस्नेही प्रॉडक्ट्स घ्या. सगळ्यात आधी तुम्ही शॉवरऐवजी बादली आणि मग वापरायला सुरुवात करायला हवी, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. प्लास्टिक टूथब्रशऐवजी बांबूचे टूथब्रश वापरात आणा, ते बायोडिग्रेडेबल आणि सहजपणे कंपोस्ट होणारे असतात. टूथपेस्टऐवजी टूथपावडर/दंतमंजन वापरायला सुरुवात करा, तुम्ही घरच्या घरीही स्वतः दंतमंजन तयार करू शकता. ते कसे तयार करायचे हे इथे पाहू शकता.प्लास्टिक बॉटल्समध्ये मिळणाऱ्या केमिकल्स असलेल्या बॉडीलोशनपेक्षा ऑरगॅनिक साबण वापरता येतील. केसांसाठी शिकेकाई हा पारंपरिक आणि ऑरगॅनिक पर्याय उपलब्ध आहे. ही औषधी वनस्पती पावडर तसेच शाम्पूच्या स्वरूपात उपलब्ध असते. त्याचे क्लिंझिंग आणि अँटीफंगल गुणधर्म केसगळती कमी करतात, केसांना चमक देतात आणि अर्थातच शाम्पूचा बॉटल्सचा कचरा त्यांच्या वापरामुळे कमी होतो.

प्लास्टिक रेझर्सचा वापर बंद करा आणि त्याऐवजी जुन्या पद्धतीची सेफ्टी रेझर्स वापरा. यातील ब्लेड रिसायकल करता येते. मासिकपाळीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या अनेक सिंगल यूज प्रॉडक्ट्स ऐवजी दीर्घकाळ टिकणारे प्रॉडक्ट्स वापरता येतील. उदा. मेन्स्ट्रुअल कप (हा किमान 10 वर्षं टिकू शकतो आणि केवळ दोन महिन्यांच्या सॅनिटरी नॅपकिन्सचा किंमतीत विकत घेता येतो.) किंवा कापडी पॅडस्, ते इकोफ्रेंडली असतात कारण तुम्ही त्यांचा दीर्घकाळ पुनर्वापर करू शकता. मेकअप काढण्यासाठी वापरले जाणारे वाईप्स प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये मिळतात आणि वापर झाल्यानंतर ते बाहेर फेकले जातात किंवा टॉयलेटमध्ये फ्लश केले जातात. यावर एक साधा सुती कपडा जो वापरल्यानंतर धुवून पुन्हा वापरता येऊ शकतो, तो सहज उपलब्ध असणारा पर्याय आहे. या पँडेमिकने क्लीन्झर आणि सॅनिटायझर यांना आपले मित्र बनवले आहे. हे दोन्ही प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये येतात आणि मोठ्या प्रमाणात विकत घेतले जातात. त्यांना पर्याय शोधणं अगदीच सोपं आहे, तुम्हाला फक्त संत्र्याच्या साली आणि व्हाईट व्हिनेगर लागेल, ते दोन्ही मिसळताच तुमचं स्वतःचं क्लीन्झर तयार!

Photo by Oana Cristina on Unsplash

३. ‘नव्या नॉर्मल’साठी ग्रीन हॅक्स :

घरातून काम करणं हे मुळातच पर्यावरणस्नेही आहे कारण यामुळे वाहतूक कमी होते पण तेवढ्याने पर्यावरणरक्षणाचं काम झालं असं नाही. उद्योगांचे कार्बन फूटप्रिंट्स कमी झाले नसून ते घराघरात विभागले गेले आहेत. घरातून काम करत असताना तुम्ही तुमच्या दिनचर्येचे मूल्यमापन केले पाहिजे. त्यामध्ये तुमचा ऊर्जेचा वापर, तुम्ही खाता ते अन्न, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वापराशिवायचा वेळ इत्यादी गोष्टी नोंद केल्या पाहिजेत. कृत्रिम प्रकाशापेक्षा नैसर्गिक प्रकाशाचा वापर केल्याने ऊर्जा बचत तर होतेच, पण शिवाय तुम्ही निसर्गाशी जोडलेले राहू शकता. सूर्य तळपत असताना तुम्हाला कृत्रिम प्रकाशाची आवश्यकताच नाही! घरात जोपासता येतील अशी शक्य तितकी रोपं, फुलझाडं तुमच्या काम करण्याच्या जागेत लावा, त्याने तुमची जागा आणि मन दोन्ही थंड राहील.

तुमची उपकरणे जेव्हा वापरात नसतील तेव्हा त्यांचा प्लग काढून ठेवा, ती जर प्लग केलेली असतील आणि वापरात नसतील तरीही ऊर्जा वापरतात. नको असलेल्या ईमेल अनसबस्क्राईब करा आणि अनावश्यक डेटा डिलीट करून टाका, कारण डेटा साठवून ठेवणाऱ्या युनिट्समध्ये हा अनावश्यक डेटा साठवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. गुगल दावा करते की त्यांच्या साईटवर केलेला प्रत्येक सर्च, कॉफीसाठी अर्धा कप पाणी उकळण्याएवढा कार्बनडायऑक्साईड निर्माण करतो. याचा अर्थ डेटालाही कार्बन फुटप्रिंट आहे आणि आपल्याकडे ती कमी कण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय आपण कॉम्प्युटर्स,लॅपटॉप्स् आणि मोबाईल्स यांवर एनर्जी सेव्हिंग मोड चालू करू शकतो. ऑफिसमध्ये असताना लोकं जास्त प्रमाणात प्रिंटिंग पेपर आणि डिस्पोझेबल पेन्स वापरतात ज्यांचं प्रमाण घरात असताना आपोआप कमी होतं. घरी आपला प्रिंटिंगसाठी खूप कमी पेपर वापरण्याकडे कल असतो आणि शक्य झाल्यास आपण अजिबात प्रिंट न काढता डिजिटल माध्यमे वापरण्याचा प्रयत्न करू शकतो. जर प्रिंटिंग टाळताच येणार नसेल तर रिसायकल पेपर्सचा वापर करावा आणि पानाच्या दोन्ही बाजूंवर प्रिंटिंग करावं.

Photo by vadim kaipov on Unsplash

तसेच घराजवळील दुकाने, मंदिर व इतर ठिकाणी पायी जावे किंवा सायकल वर जावे. त्यामुळे आरोग्य चांगले राहील, आणि प्रदूषण व रहदारी कमी होईल.

सवयी बदलणं ही एक संथ प्रक्रिया आहे, पण या प्रवासात सोपं हे आहे की, दिनचर्या सोपी ठेवणे आणि गरजा कमी करणे. या ब्लॉगमध्ये उल्लेख केलेल्या हॅक्स, बदल तुमच्या दिनचर्येत बसायला कदाचित थोडा वेळ लागेल, पण लवकरच ते तुमच्या जगण्याचा एक भाग होतील. समजून उमजून निवड करा आणि अधिक चांगला जगासाठी योगदान द्या!

आमच्या इंस्टाग्राम कम्युनिटीचा भाग व्हा आणि अशा अनेक हॅक्स, आणि इतर कित्येक सिरीजच्या बाबतीत अपडेटेड रहा!

लेखन : आश्लेषा कारंडे, कम्युनिकेशन एक्झिक्युटिव्ह, सोशल लॅब.

(Translated By- Bhagyashree Redekar)

Social Lab Environmental Solutions is a waste management company, which helps brands take-back and scientifically dispose of post-consumer plastic waste of their products. Brands take our services to fulfill Extended Producer Responsibility (EPR) obligation under Plastic Waste Management Rules, 2018.

Our Social Media

LinkedIn- https://tinyurl.com/4s3qsav4

Instagram- https://tinyurl.com/cai697bb

Facebook- https://tinyurl.com/uwsrxfcr

Twitter- https://tinyurl.com/kqse5yk1

Pinterest- https://tinyurl.com/nu3w9uv9

--

--

Social Lab
Social Lab

Written by Social Lab

We are a waste management company, which helps brands take-back and scientifically dispose of post-consumer plastic waste of their products.

No responses yet