शहरातील कचराकुंड्यांचे (GVPs) निर्मूलन करण्यासाठीची पद्धती
कचराकुंड्या, ज्याला गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट्स (GVP) अथवा “डार्क स्पॉट्स” असेही म्हटले जाते, म्हणजे अशी ठिकाणे जिथे रहिवासी वारंवार कचरा टाकतात. यामुळे पर्यावरणावर व स्थानिक लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, आणि भोवतालचा परिसर अस्वच्छ दिसतो. पर्यावरणावरील परिणामांमध्ये मृदा आणि जल प्रदूषण, वायू प्रदूषण (कचरा जाळण्यापासून) आणि मूल्यवान कचऱ्याचा पुनर्वापर करण्याची क्षमता नष्ट होणे इत्यादींचा समावेश होतो. तसेच कचरा वाऱ्याने उडून जातो व पावसाबरोबर वाहून जातो आणि परिणामी ड्रेनेज सिस्टममध्ये अडकल्यामुळे जलस्रोतांचे प्रदूषण होते. त्याचबरोबर कचऱ्याकुंड्यांच्या ठिकाणी डास, उंदीर आणि भटक्या जनावरांच्या प्रादुर्भावामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रसार होऊ शकतो.
GVP चे निर्मूलन कसे करावे?
GVPs च्या निर्मूलनासाठी ५ महत्त्वाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यामध्ये GVP चे मूळ कारण शोधण्यासाठीचा सर्वे, IEC मोहिम जनजागृती, GVP भागातील कचरा संकलन सुनिश्चितीकरण, GVP सुशोभीकरण आणि मॉनिटरिंग यांचा समावेश होतो.
१. GVP चे मूळ कारण शोधण्यासाठीचा सर्वे
GVPs चे मूळ कारण शोधण्याकरिता तेथील स्थानिक रहिवासी, दुकाने, व स्थानिक संस्थांबरोबर सर्वेद्वारे संवाद साधला जातो. तसेच संबंधित स्वच्छता निरीक्षक आणि प्रभाग अधिकारी यांच्याशी देखील चर्चा करण्यात येते. त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी दोन-तीन दिवस किंवा आठवडाभर स्वतंत्र निरीक्षण करूनही कारण मीमंसा केली जाते. सामान्यतः कचरा संकलनाचा अभाव व जागरूकतेचा अभाव ही मुख्य कारणे आढळून येतात. नंतर GVP सर्वे च्या आधारावर GVP निर्मूलन करण्यासाठीचा प्लॅन तयार केला जातो व संबंधित भागधारक ओळखले जातात.
२. IEC मोहिम जनजागृती
GVP निर्मूलन करण्यासाठी जनजागृती मध्ये कॉर्नर मीटिंग्ज, पथनाट्य, सेग्रिगेशन डेमो, IEC साहित्याचे वितरण, सोशल मीडिया एंगेजमेंट इत्यादी उपक्रम राबवले जातात. यामध्ये कचऱ्याचे प्रकार, कचरा उघड्यावर फेकण्याचे व कचरा जाळण्याचे दुष्परिणाम, कचरा संकलनाचे मार्ग आणि वेळ, स्त्रोत विलगीकरणाचे महत्त्व, होम कंपोस्टिंग इत्यादी बाबींविषयी माहिती देण्यात येते.
३. कचरा संकलन सुनिश्चितीकरण
ज्या ठिकाणी नियमित कचरा संकलनाचा अभाव हे GVP चे एक कारण आढळून येते, तेथे नगरपालिका आणि संकलन कंत्राटदार यांच्याशी सल्लामसलत करून संकलन मार्ग आणि वेळापत्रक बनविण्यात येते. यासाठी GPS आधारित प्रणालीचा वापर केला जातो.
४. GVP सुशोभीकरण
लोकांना कचरा उघड्यावर टाकण्यापासून परावृत्त करण्यासाठी अजुन एक प्रभावशाली उपाय म्हणजे जागेचे सुशोभीकरण. यासाठी GVP च्या ठिकाणी रांगोळी, बॅनर, वृक्षारोपण, बेंच स्थापना व पाणपोई इत्यादी साधनांचा वापर केला जातो.
५. मॉनिटरिंग
शक्यतो लोकांच्या वर्तणुकीमध्ये बदल येण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी GVP च्या ठिकाणी सुरुवातीच्या कालावधीमध्ये नियमित देखरेख प्रणाली आवश्यक आहे. यासाठी वैयक्तिक रित्या तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून निरीक्षण केले जाऊ शकते.
वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास सांगू इच्छितो की सोशल लॅबने आतापर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातमधील २० हून अधिक शहरांमधील ३७१ पेक्षा जास्त GVPs निर्मूलन करण्यामध्ये योगदान दिले आहे.
याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया श्री. कुणाल ठाकूर यांना (+९१-९९६०४७९७८५) या क्रमांकावर किंवा kunal@social-lab.in या ई-मेल ID वर संपर्क साधावा. अशा प्रकारचे उपक्रम आपल्या शहरात राबवण्यासाठी आपणास सहाय्य करण्यासाठी आम्हाला आनंद होईल.
घनकचरा व्यवस्थापनातील घडामोडी जाणून घेण्यासाठी कृपया या लिंकच्या माध्यमातून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. आमच्याबद्दल आणि सेक्टर अपडेट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला (www.social-lab.in) भेट द्या आणि आम्हाला सोशल मीडिया (https://linktr.ee/Social_Lab) ला फॉलो करा.
लेखक: ईशा बिल्दीकर आणि अनिरुद्ध पांडव, सोशल लॅब.